बाहूंचा करूनी झुला, झुलविलेत तुम्ही मजला
श्वासातून, तुमच्या मी तेव्हा, कौतुकाचा गंध घेतला || १ ||
मायेची करूनी शाल, निजविलेत तुम्ही मजला
हृदयातून, तुमच्या मी तेव्हा, वात्सल्याचा नाद ऐकला || २ ||
अडखळत्या पावलांनी माझ्या, तुमचाच जेव्हा, वेध घेतला
हातांत, तुमच्या मी तेव्हा, विश्वासाचा स्पर्श पाहिला || ३ ||
तत्वांची करुनी गुटी पाजलीत तुम्ही मजला
मनात, तुमच्या मी तेव्हा, मूल्यांचा निर्धार पहिला || ४ ||
चुकलेल्या क्षणांनी माझ्या, तुमचा जेव्हा अंत पाहिला
संतापातही तुमच्या मी तेव्हा, काळजीचा बांध पाहिला || ५ ||
वेदनांशी गाठ होता, खांद्यावर, तुमच्याच विसावले
डोळ्यांत, तुमच्याही तेव्हा, वेदनांचा डोह पाहिला || ६ ||
क्षितिजाकडे पंखांनी माझ्या, घेतली जेव्हा भरारी
अश्रूंत, तुमच्या मी तेव्हा, आनंदाचा बहर पहिला || ७ ||
नशिबाने तुमची जेव्हा, सत्व-परीक्षा पाहिली
शांत-निश्चल मुद्रेत तुमच्या, भक्तीचा मी झरा पाहिला || ८ ||
कैवल्याची आस होता, तुमचीच आठवण जाहली
गुरु मानुनी तुम्हां तेव्हा, आले तुमच्याच पाऊली || ९ ||
No comments:
Post a Comment