मागणं
जग सारं मागत असतं सुखांची बरसात
माझं मागणं एवढंच, कर संकटांवर मात
आणि जर ते तुझ्या नसेल मनात, तर दे तुझी अखंड साथ...
दे तुझी अखंड साथ, करण्या संकटांशी दोन हात
अन तेवढी माझी नसेल पुण्याई, तर निदान एवढं तरी कर...
निदान एवढं तरी कर...
आशेचा एक नंदादीप राहूदे सतत तेवत,
त्या आशेवरच काढेन मी, आयुष्य हसत-खेळत
त्या दीपा मध्ये जळो माझ्या अहंकाराची वात,
वात सतत भिजलेली राहो भक्तीच्या तेलात
त्या ज्योतीला न लागो मोहाचा वारा,
त्या प्रकाशानं उजळो मनाचा कोपरा न कोपरा